संघटना ( इतिहास)

संघटनेचे ऐतिहासिक वर्णन
         
 संदर्भ - डीबाक्स गॕझेट मधील 
       आयु.विलास पाटील यांच्या लेखातून

"एकीचे बळ म्हणजे संघटन"
          या उक्तीचा अर्थ लक्षात घेऊन अमेरिकन स्वतंत्र युद्ध तथा फ्रेंच राज्यक्रांतीचा विजय व 1857 च्या उठावातील पराभव यातील भेद ओळखून व धामणगाव शहरातील लोकांची गरज लक्षात घेऊन 6 डिसेंबर 1995 ला [DBAKS] डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली.
         संघटना स्थापन करण्याचा मुख्य हेतू म्हणजे सन 1995 च्या काळात धामणगाव रेल्वे मध्ये प्रत्येक कर्मचारी नवीन होता आणि जे जुने प्रस्तापित नोकरी करणारे कर्मचारी होते ते स्वतःला पांढरपेशा वर्गातील समजून आंबेडकरी समाजापासून दूर होते. त्यामुळे मूळचे धामणगाव मधील लोकही कर्मचाऱ्यांशी नाते ठेवत नव्हते. धामणगावातील सर्व कर्मचारी विखुरलेले होते. सार्वजनिक ठिकाणी भीतीमुळे एकमेकांसोबत जयभीमही घेत नव्हते. अशातच सन 1995 मध्ये बाहेर गावावरून आलेले सहदेव पाटील यांच्या आईचे प्रेत  नेण्याकरिता लोकं नव्हते. तसेच ऋषी भोंगाडे यांच्या आईच्या अंत्यविधीस अतिशय कमी लोक होते. तेव्हा दुर्योधन अर्जूने, न्यायमूर्ती टि.जी. बनसोड, नरेंद्र डोईफोडे, पी.पी.  बनसोड, आर. जे. भिलंगे यांनी धामणगावातील फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांना एकत्र करून 6 डिसेंबर 1995 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेची स्थापना केली. तेव्हा लोकांमध्ये नवचैतन्य व उत्साह वाढला. या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून ऋषी भोंगाडे तर सचिव दुर्योधन अर्जूने हे होते.
             सर्वांनी विचार विनिमय करून संघटनेची खालील उद्दिष्टे ठरविली -
१)संघटना ही राजकारणापासून अलिप्त राहील.
२) संघटनेतील सभासद धामणगावातील प्रत्येक सभासदांच्या सुखदुःखात सहभागी होईल.
३) संघटनेतील सभासद दर पौर्णिमेला एकत्र येतील.
४)सामाजिक प्रबोधन व्हावे याकरिता विविधम हापुरुषांचे जयंती उत्सव साजरे केले जातील.
५) समाजातील विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास व्हावा याकरिता बौद्धिक व इतर विविध स्पर्धा घेतल्या जातील.
६)संघटनेतील सर्व सभासदांच्या कुटुंबातील व्यक्तींची नोंद घेतल्या जाईल.
७) समाजकार्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविले जातील.
८)सभासदांना वार्षिक वर्गणी देणे बंधनकारक राहील.

    सन १९९६ ---
            १४ एप्रिल १९९६ ला कर्मचारी संघटनेद्वारे सार्वजनिक ठिकाणी डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंत्युत्सव करण्याचे ठरविण्यात आले.पहिल्याच जयंत्युत्सव कार्यक्रमाला हायकोर्टाचे न्यायाधिश मा.भाऊसाहेब वाहाणे, मा.प्रभाकर कोचे, प्राचार्य मा.मनोहरराव वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले. भाऊसाहेब वाहाणे यांनी मील कामगारांच्या आईचा मुलगा हा हायकोर्टाचा जज होऊ शकतो.हे स्वतःच्या उदा.ने पटवून दिले.
                त्यानंतर मार्च 1996 ला दहावीच्या परीक्षेत दुर्योधनजी अर्जूने यांची मुलगी- कुमारी शिल्पा अर्जूने ही गुणवत्ता यादीत आल्यामुळे तिचा सत्कार करण्याकरिता गुणवंतांचा गुणगौरव हा कार्यक्रम 15 ऑगस्ट 1996 ला शेतकरी भवन येथे घेण्यात आला. त्यावेळी दहावी मध्ये गुणवत्ता यादीत आल्याबद्दल शिल्पा अर्जूने हिचाआणि नेट सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा.गणेश टाले ,प्रा. प्रभावती विहिरे,  प्रा.विनोद कांबळे यांचाही सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.
     सन १९९७ --
       त्यानंतर सन १९९७ मध्ये मा.ऋषी भोंगाडे (अध्‍यक्ष) व मा. विलास पाटील (सचिव) असताना प्राचार्य शिवदास उठाने चांदुर रेल्वे व प्रा. सागर जाधव यांनी आंबेडकरी विचारधारेवर मार्गदर्शन केले.
     सन १९९८ --
    त्यानंतर सन १९९८ मध्ये मा.नरेंद्र डोईफोडे (अध्यक्ष ) असताना पत्रकार मा. जगन वंजारी व.प्रा. लिलाताई भेले यांनी दीक्षाभूमीवर गेल्यानंतर माणसांची अस्मिता जागृत होऊन स्वाभिमानी माणूस कसा तयार होतो या विचाराने लोकांना मंत्रमुग्ध केले.
    सन १९९९ --
      यावर्षी प्राध्यापक अशोक राणा यवतमाळ व चंद्रकांत ढाकुलकर यांचे मार्गदर्शन लागले.
    सन २००० /०१  --
          त्यानंतर सन २००० ते २००१ या वर्षात मा.संजय पाटील (अध्यक्ष) व मा.सुरेंद्र भिडे (सचिव) असताना प्राध्यापक मा.म. देशमुख हे आले होते. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशनानंतर त्यांची जेव्हा प्रेतयात्रा काढली, तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून नागपुरातील बौद्ध विद्यार्थ्यांनी प्रेम यात्रा काढून माझा गौरव केला असे त्यांनी सांगितले. २००१ मध्ये ॲडव्होकेट दिलीप एडतकर आणि ॲडव्होकेट गणेश हलकारे यांनी समाजातील अंधश्रद्धेवर ताशेरे ओढले. तसेच प्राध्यापक संजय पाटील अध्यक्ष असताना संघटनेद्वारे २६ जानेवारी २००१ ला संविधान दिन गांधी भवन धामणगाव रेल्वे येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी माननीय श्री. अलसीदास राठी, ॲडव्होकेट श्यामसुंदर पसारी यांचे मार्गदर्शन लाभले.
    सन २००२ --
      सन २००२मध्ये मा.रविंद्र जिंदे (अध्यक्ष) व मा. विलास पाटील (सचिव) असताना प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ बुटले व अशोक सरस्वती हे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी त्यांच्या कीर्तनातून फुले,शाहू,आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले.
     सन २००३ --
  सन २००३ मध्ये प्राध्यापक प्रमोद हातेकर (अध्यक्ष) व मा.   सुरेंद्र मनोहर (सचिव) असताना अशोक बुरबुरे (हिंगणघाट) लिखित व ॲडव्होकेट अविनाश भगत दिग्दर्शित "आक्ट" हे नाटक धामणगावातील प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. या नाटकांमधून आईचे 'आक्ट' धरण्यापेक्षा मुलगा वही पेन्सिल करिता मयतीच्या मागे फेकलेले पैसे उचलते. यावरून बहुजन समाजातील मुलांना बाबासाहेबांमुळे वही पेन्सिल चे महत्व  कळले हे दाखवून दिले.
      प्राध्यापक प्रमोद हातेकर अध्यक्ष व सुरेंद्र मनोहर सचिव असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संघटनेद्वारे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीच्या समाजसेविका रजिया सुलताना व प्राध्यापक अरुण बुंदेले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रायोजक संघटनेचे सभासद विलास पाटील हे होते. सदर कार्यक्रमात विलास पाटील यांचा मुलगा चिरंजीव हिमांशू चा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. केलेल्या आवाहनानुसार संघटनेच्या सर्व सभासदांनी चिरंजीव हिमांशूला भेटवस्तु ऐवजी पुस्तके ग्रंथ भेट म्हणून दिलेत. याप्रसंगी विलास पाटील यांनी वाढदिवसाला आलेली जवळपास 500 पुस्तके संघटनेला दान दिली. संघटनेला मिळालेल्या पाचशे पुस्तकांच्या आधारे 19 फेब्रुवारी 2004 ला शिवजयंतीच्या पर्वावर जुना धामणगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय DBAKS च्या  वतीने सुरू करण्यात आले. वाचनालयाच्या सर्व सभासदांनी दरमहा शंभर रुपये योगदान देऊन वाचनालय यशस्वीपणे चालविले. वाचनालयाचे प्रथम अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद हातेकर व सचिव सुरेंद्र मनोहर हे होते. आज वाचनालय प्रगतीपथावर असून वाचनालयाला शासनाचा क दर्जा प्राप्त झाला आहे.
    सन २००४ --
     सन २००४ मध्ये संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक शृंगारे तर सचिव जनार्दन बोरगे हे असताना प्रमुख पाहुणे म्हणून श्री पेटकर हिंगणघाट व प्राध्यापक विनायक त्रीपत्तीवार हे होते. त्यांनी आपल्या वाणीतून फुले शाहू आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचले.
        आपल्या संघटनेतील सभासदांची आर्थिक गरज पूर्ण व्हावी याकरिता सन २००४ मध्ये म्हणजे याच वर्षी माननीय अशोकराव मोहोड, सुभाष भोगे ,सुरेंद्र मनोहर, पी.पी. बनसोड , ईश्वरदास बागडे ,प्राध्यापक शृंगारे सर यांच्या प्रयत्नाने अर्थ कलश मागासवर्गीय कर्मचारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. या पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय अशोकराव मोहोड हे आहे.
   सन २००५ --
    सन २००५ मध्ये प्राध्यापक गौतम सनकाळे अध्यक्ष व सचिव माननीय विजय लोखंडे होते. त्यांच्या काळात माजी आमदार नेताजी राजगडकर व विजय मानकर (आय.आर.एस.) नागपूर हे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी तडफदार वाणीने श्रोत्यांना जिंकले.
   सन २००६ --
      सन २००६ मध्ये प्राध्यापक गौतम सनकाळे यांच्या कार्यकाळात प्राध्यापक प्रदीप आगलावे व जिल्हाधिकारी नानक रामटेके यांनी आंबेडकरी विचार समाजापर्यंत पोहोचवले.
    सन २००७ --
        सन २००७ मध्ये विलास पाटील अध्यक्ष व दिनेश महेश गौरी सचिव असताना माननीय लक्ष्मण माने यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे चांदा ते ब्रांदा धम्मरथ यात्रा निघाली होती. संघटनेने तो धम्मरथ धामणगाव येथे आणून लक्ष्मण माने यांचे धामणगाव मध्ये प्रबोधन आयोजित केले गेले. या कार्यक्रमाकरिता डॉक्टर हर्षदीप कांबळे जिल्हाधिकारी यवतमाळ व माननीय ई.  झेड. खोब्रागडे जिल्हाधिकारी वर्धा यांचे सहकार्य लाभले होते.
       सन २००८ --
      सन २००८ मध्ये इश्वरदास बागडे अध्यक्ष व अशोकराव मोहोड सचिव असताना आयुष्यमान भाऊ लोखंडे नागपूर व टि.जी. गेडाम यांचे मार्गदर्शन लाभले.
    सन २००९ --
  सन २००९ मध्ये प्राध्यापक शत्रुघ्न गोसावी अध्यक्ष व प्राध्यापक प्रमोद हातेकर सचिव असतांना प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नरेंद्र गेडाम व प्राध्यापक आर एम इंगळे अकोला होते. त्यांनी त्यांच्या भाषणातून सामाजिक जागृती केली.
      सन २०१० --
     सन २०१० मध्ये माननीय अरुण वहिले अध्यक्ष व देवेंद्र इटिवाले सचिव होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खोब्रागडे इंजिनियर, डॉक्टर अशोक पडवेकर, माननीय प्रभू (उपायुक्त ) यांनी प्रबोधन केले.
     सन २०११ --
     सन २०११ मध्ये मा. गौतम गजभिये अध्यक्ष व वसंत वासनिक सचिव असताना प्राध्यापक सुषमा अंधारे व मा. विलास काळे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी त्यांच्या वाणीतून क्रांतिकारी विचार समाजापर्यंत पोहोचविले.
    सन २०१२ --
     सन २०१२ मध्ये अध्यक्ष म्हणून श्री. सुरेश वानखडे व सचिव म्हणून श्री. पुंडलिक फुले असताना प्रमुख पाहुणे श्री.  ए.झेड खोब्रागडे नागपूर यांनी भारतीय घटनेच्या प्रास्ताविकेचे महत्व सांगितले. याच वर्षीपासून संघटनेद्वारे भिमपहाट हा एक सुंदर संगीतमय कार्यक्रम दरवर्षी १४ एप्रिल रोजी भीम जयंतीच्या पर्वावर सकाळी ठिक ५:३० वाजता नगरपरिषद प्रांगणामध्ये घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हजारो बौद्ध बांधव पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून भीम गीताचा कार्यक्रम ऐकण्यासाठी व बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता एकत्र येतात. व शेवटी सामुहिक वंदनेने कार्यक्रमाचा समारोप होतो.
      सन २०१३ --
      सन २०१३ मध्ये महिलांचे सबलीकरण व्हावे.व त्यांना नेतृत्व लाभावे म्हणून अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रभावती विहिरे व सचिव रजनीताई टेंभूर्णे यांच्याकडे संघटनेची धुरा दिली. त्यांच्या काळात प्रमुख पाहुणे म्हणून महानायक चे संपादक माननीय सुनील खोब्रागडे (मुंबई) रमेश जीवन (यवतमाळ) हे होते. त्यांनी आपल्या विचारशैलीद्वारे बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचले.
         तसेच संघटनेद्वारे २०१३ पासून डॉ. प्रशांत रोकडे यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका सुरू करण्यात आली. याकरता संघटनेचे सभासद प्रतिमहा दोनशे रुपये आर्थिक सहयोग देतात. अभ्यासिका मध्ये अभ्यास करून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्यरत असून आजही तीस विद्यार्थी नियमितपणे या अभ्यासिकेत अभ्यास करतात. या अभ्यासिकेचे संचालक मंडळ तयार करण्‍यात आले असून ते अभ्यासिकेच्या कामकाजावर विशेष लक्ष ठेवून असतात.
     सन २०१४ --
      सन २०१४ मध्ये प्राध्यापक डॉ. गणेश टाले अध्यक्ष व प्राध्यापक प्रमोद हातेकर सचिव असतानाच्या काळात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आनंद गायकवाड व माननीय मन्सूर एजाज जोश व नूर भाई हे होते. त्यांचे मौलिक विचार भर पावसातही श्रोते मंडळी झाडाचा आधार घेऊन ऐकत होते.
   सन २०१५ --
     सन २०१५ मध्ये श्री. विलास पाटील अध्यक्ष व श्री. सुरेश वानखडे सचिव असताना प्रमुख पाहुणे म्हणून प्रबोधनकार सत्यपाल महाराज हे होते. मनोरंजन पद्धतीने प्रबोधनकार सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. धामणगावातील हजारो लोकांनी उपस्थित राहून किर्तनाचा आस्वाद घेतला. याच वर्षी विद्यार्थ्याकरिता सेफला ग्राउंडवर दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच निबंध स्पर्धेमध्ये २०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर बुद्धिमत्ता स्पर्धेकरिता १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
   
       - ( संघटनेचा हा प्रवास सुरू असतानाच संघटनेतील पुष्करनानगर मध्ये राहणाऱ्या सभासदांनी "जीवक सामाजिक व सांस्कृतिक  संस्था"  स्थापन करून भव्य विहाराची निर्मिती केली. तसेच पृथ्वीराज नगर मधील सभासदांनी "मैत्रेय बहुउद्देशीय संस्था" स्थापन करून भव्य विहाराच्या उभारण्याचे काम पूर्ण केले.
      याच बरोबर समाजावर कोठे अन्याय झाल्यास समाज जागृती करण्याचे प्रयत्न संघटनेद्वारे केले जाते.
---------------------------------------------
---------------------------------------------

      सन २०१६ --
      सन २०१७ --
      सन २०१७ मध्ये मा. देवानंद दहाट -अध्यक्ष व मा.अनिल खाकसे हे सचिव असताना त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी व माननीय सिद्धार्थ मोकळे साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवले.
        याच वर्षी भिमपहाट या कार्यक्रमात समाजातील मुलांना सहभागी करून त्यांच्यामधील सुप्तगुणांना प्रेरणा देण्यासाठी मुलांद्वारे भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आयु. सुरेश वानखडे सर यांचे विशेष योगदान लाभले. या कार्यक्रमातून समाजातील अनेक मुले मुली सहभागी होऊन त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळाली.
        या वर्षीपासूनच संघटनेचा एक Whatsapp ग्रुप -"भीमजयंती" तयार करण्यात आला. संघटनेतील योगदान देणाऱ्या सर्व सभासदांची यादी व्हाट्सअप ग्रुप-(भीमजयंती)  वर टाकण्यात आली व जमाखर्चाचा हिशोब सुद्धा व्हाट्सअप वर देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. त्यामुळे संघटनेबद्दल विश्वासाचे वातावरण सर्व सभासदांमध्ये निर्माण झाले व संघटना आणखी बळकट बनत गेली. आता तोच Whatsapp ग्रुप म्हणजे आजचा DBAKS ग्रुप होय.

      सन २०१८  व सन २०१९ ---
सन २०१८ मध्ये मा. विजय सगणे -अध्यक्ष व  मा. रामदास पाटील- सचिव असताना घेण्यात आलेल्या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाकरिता मा. अमोल मिटकरी(संभाजी ब्रिगेड) व मा. देविदास कठाणे यांना बोलावण्यात आले. त्यांनी आपल्या वाणीतून जोरदार समाज प्रबोधन केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग उपस्थित होता.
   तसेच यांच्याच काळात सन २०१९ मध्ये समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी मा. उत्तम कांबळे - संपादक दैनिक सकाळ व मा. डॉ. अशोक चोपडे - सत्यशोधक समाज कार्यकर्ते यांना बोलावण्यात आले. त्यांनी बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचविले.
       यावर्षी धामणगाव शहर परिसरामध्ये वेगवेगळ्या नगरांमधील विहारांमध्ये या संघटनेचे जे सदस्य  बालसंस्कार वर्ग चालवतात, त्यांची दखल घेण्यात आली. आणि त्या सर्व संयोजकांना गौरवपत्र देऊन त्यांचा संघटनेच्या वतीने  गौरव  करण्यात आला.
     सन २०२० --
         सन २०२० मध्ये आयू.राजेंद्र भेले - अध्यक्ष व आयू. गौतम सनकाळे सचिव असताना नियोजित समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी सर्व सदस्यांमार्फत वर्गणी गोळा करण्यात आली. परंतु कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन ची स्थिती निर्माण झाली.
        त्यामुळे संघटनेमार्फत सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम घेता आला नाही. पूर्व नियोजनानुसार गोळा झालेली वर्गणी या लाॕकडाऊनच्या काळात आर्थिक परिस्थिती खालावलेली अत्यंत गरजू व गरिब लोकांना किराणा किट वाटप करून समाजातील आपल्या संघटनेप्रती लोकांमधील असलेला गैरसमज दूर करून संघटनेची प्रतिमा उंचावली.
       आणि या महतकार्यातून बाबासाहेबांना एक प्रकारचे आगळे वेगळे अभिवादन  करण्यात आले.

                           * संकलन*
                       > देवानंद दहाट <